किल्ले शिवनेरी
शिवनेरी किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. सातवाहन काळापासूनचा नाणेघाट हा प्राचीन व्यापारी मार्ग आहे. या प्राचीन नाणेघाटाच्या घाटमाथ्यावरील पहारेकरी होते शिवनेरी, जीवधन, चावंड आणि हडसर. पूर्वी जीर्णनगर, जुन्नीनगर, जुने नगर, जुन्नेर अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या जुन्नरच्या शिरपेच्यातील मोत्याचा तुरा म्हणजे आपला शिवनेरी किल्ला. शिवनेरी किल्ल्याच्या नावावरून बाळराजांचे नाव ठेवले- शिवाजीराजे. किल्ले शिवनेरी आपल्याला शिवरायांच्या पाळण्याची आठवण करून देते. चला तर मग शिवरायांच्या आठवणी नव्याने अनुभवू आजच शिवसृष्टीतील शिवनेरीची झलक पाहू.
किल्ले राजगड
इ.स. १६४७. स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली जात असताना. कानदखोन्यातला तोरणा किल्ला महाराजांनी अलगद छापा घालून जिंकून घेतला आणि लगेच महाराजांचं लक्ष गेलं ते तोरण्याच्या पूर्वेला असलेल्या एका प्रचंड अशा डोंगराकडे. मरुंबदेवाचा पर्वत म्हणून ओळखला जाणारा औरसचौरस पसरलेला हा डोंगर होता. महाराजांनी लगोलग हा डोंगर खास जाऊन पाहिला. फिरताफिरताच जणू काही राजांच्या नजरेत भविष्यातली आपली राजधानी आकार घेत होती. ही राजधानी म्हणजे राजगड, गडांचा राजा आणि राजांचा गड. सुवेळा आणि संजीवनी माच्यांचे पंख पसरुन, पद्मावती माचीचा शेपटा तोलून, आकाशात उत्तुंग भरारी घेणाऱ्या एखाद्या गरुडाप्रमाणे भासणारा राजगड. स्वराज्याची पहिली राजधानी! अशा या राजधानी राजगडाची प्रतिकृती आजच पहा, शिवसृष्टी पुणे इथे आजच भेट द्या.
पन्हाळगड - विशाळगड
१० नोव्हेंबर १६५९, महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाचा वध केला आणि एकाही दिवसाची विश्रांती न घेता महाराजांनी आक्रमण सुरू केले. शिवशाहीचा त्रिशूळ आदिलशाहीत शिरला. मायणी, कढेलोण, अष्टी, वाळवे, औदुंबर, मसूर, क-हाड, नेरले अशी एकामागून एक ठिकाणे घेत घेत अठराव्या दिवशी चक्क पन्हाळ्यासारखा बेलागगड देखील स्वराज्यात आला. पन्हाळ्यासारखा यादवकालीन गड दृष्ट लागावी इतकी सुरेख बांधणी, दख्खनचे द्वार, दुय्यम राजधानी म्हणावा इतके महत्त्व. महाराजांनी एक रात्र जागून मशालींच्या प्रकाशात अवघा गड बघितला. महाराजांनी पन्हाळ्याचे ठाणे अतिशय मजबूत केले. महाराजांच्या या पन्हाळगडाची प्रतिकृती बघण्यासाठी आजच पुण्यातल्या शिवसृष्टीला भेट द्या.
किल्ले पुरंदर
इंद्राने शत्रूच्या सर्व दुर्गाचा नाश केला म्हणून त्या किल्ल्याला "पुरंदर" असे नाव प्राप्त झाले. याच नावाचा एक बलदंडगड जणू वज्रासहीत पुण्यापासून हाकेच्या अंतरावर ताठ मानेने उभा आहे-पुरंदर आणि त्याचा जोड किल्ला वज्रगड. पुरंदर कुठल्या काळात बांधला ह्याचा उल्लेख नाही. मात्र १२४६ मध्ये पुण्येश्वर व नारायण हे देव पुरंदरी नेले असा उल्लेख मिळतो. बहामनी, बिदरशाही, आदिलशाही असा प्रवास करीत ऑक्टोबर १६५६ मध्ये हा दुर्ग आदिलशाही किल्लेदार नीळकंठराव यांचा मुलगा निळोजी याच्याकडून महाराजांनी हा किल्ला मिळवला आहे. विजापूरकरांचे महाराजांच्या या हालचालींवर लक्ष होते. एकीकडे मुस्तफाखान अफझलखान आणि घोरपड्यांनी शहाजी राजांना दग्याने अटक केली व दुसरीकडे फत्तेखान स्वराज्यावर चालून आला. स्वराज्यावरील पहिले मोठे आक्रमण पुरंदर गडाने आपल्या रुंद छातीवर झेलले आणि परतवून लावले. महाराजांना मोठा विजय मिळाला. या विजया पाठोपाठ काही महिन्यातच पुरंदर किल्ल्यावर १४ मे १६५७, शंभूराजांचा जन्म झाला. अशा या विक्रमी पुरंदर किल्ल्याची देखणी प्रतिकृती पाहण्यासाठी पुण्यातील शिवसृष्टीला आजच भेट द्या.
दुर्गदुर्गेश्वर रायगड
सह्याद्रीतील खोलच खोल दऱ्या, उंच उंच गिरीशिखरे, खळाळणाऱ्या नद्या, घनदाट वनराई असणारा महाकाय, बलदंड, आणि आडदांड सह्याद्री. सह्याद्रीतील हे गिरीशिखर म्हणजे एक छोटेखानी किल्लाच होता. रायरी जावळीच्या विजयानंतर स्वराज्यात आला. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी चहूअंगांनी निरखन - पारखून घेतला.
महाराज प्रसन्न होऊन म्हणाले ‘ रायरी गड बहुत चखोट ‘. गडाचे कडे तर तासल्याप्रमाणे. दीड गांवाइतकी याची उंची. बेलाग कड्याचा धोंडा तर अगदी तासून काढल्यासारखा! पावसाळ्यातसुद्धा कड्यावर गवत उगवत नाही. देवगिरी हा पृथ्वीवरील चखोट गड खरा; परंतु तो याच्या समोर उंचीने बुटका त्याच्याहून हा दशगुणी उंच. रायरीचे रुप पालटले, हिरोजीने मंदिरे, घरे, वने, रस्ते, विहिरी, आड, तलाव बांधले. उंच उंच राजगृहांची निर्मिती केली. रायरी किल्ल्याचा दुर्गदुर्गेश्वर रायगड बनला. ही महाराष्ट्राच्या स्वराज्याची एकखांबी व्दारका... दुर्गांचा राजा... दुर्गदुर्गेश्वर...रायगड... इथे यावं महाराजांच्या समाधीवर मस्त टेकवावं आणि म्हणावं “ तव शौर्याचा एक अंश दे! तव धैर्याचा जरा स्पर्श दे ! तव तेजांतिल एक किरण दे ! जीवनांतला एकच क्षण दे । “ या रायगडाची प्रतिकृती खास तुमच्या भेटीला घेऊन येत आहे शिवसृष्टी.